पळासखेडा येथील सोलर ड्रायिंग प्रकल्पाचे भूमिपूजन
जिल्हा-तालुकास्तरावर विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणार - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

जळगाव, दि. १९ मे २०२५ |खान्देश लाईव्ह न्यूज|
जिल्हा व तालुकास्तरावर महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी शासकीय पातळीवर जागा उपलब्ध करून दिली जाईल. गरज भासल्यास नवीन जागा विकसित करण्यातही शासन मदत करेल. सक्षमीकरण, उद्यमशीलता व उत्पन्नवाढ यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. ग्रामसंघ, प्रभागसंघ यांच्याकडून येणाऱ्या समस्या व सूचना शासन गांभीर्याने घेईल.”असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत नारीशक्ती महिला प्रभाग संघ, नेरी दिगर व पळासखेडा (प्र.न.) यांच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा व राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या आर्थिक विकास व उत्पन्नवाढ घटकांतर्गत सोलर ड्रायिंग प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा पळासखेडा बु. (ता. जामनेर) येथे त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल (भा.प्र.से.),ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्री. राजू लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भाऊसाहेब अकलाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. कैलास काळे, सरपंच श्री. भिका तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिला बचत गट हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकट स्तंभ आहेत. शासनाच्या विविध योजना यशस्वी होण्यासाठी महिला गटांचे योगदान अमूल्य आहे. आज सादर झालेला सोलर ड्रायिंग प्रकल्प म्हणजे महिलांच्या स्वावलंबनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. शासनाच्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांतून गरजू घटकांना थेट फायदा मिळावा, ही आमची भूमिका असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी या कार्यक्रमामागची भूमिका विशद केली. येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून वेगवेगळे कार्यक्रमाचे विस्तृतपणे आपल्या प्रास्ताविकात मांडले.
कार्यक्रमात समृद्ध पंचायतराज अभियान, घरकुल ग्रामस्पर्धा २०२५–२६, मुक्ताई स्वच्छ ग्राम अभियान, मिनी एटीएम व बँकिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन, गरुडझेप ग्रामसंघास ट्रॅक्टरचे वितरण तसेच ३६ उत्कृष्ट महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात दीपप्रज्वलन, महापुरुषांच्या प्रतिमा पूजनासह पाहुण्यांचे स्वागत स्थानिक उत्पादनांच्या टोपल्या देऊन करण्यात आले. महिलांनी प्रभाग संघाच्या कार्याचा आढावा घेतला. उद्योगातील अडचणी, लेखाजोखा, पगारवाढ व ग्रामस्तरीय सुविधा याबाबत सूचना मांडण्यात आल्या.
श्री. ज्ञानेश्वर बाविस्कर यांनी आभार मानले. नेरी दिगर व पळासखेडा प्रभागातील महिला सख्या व पदाधिकारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमातून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला अशी माहिती देऊन ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक श्री. राजू लोखंडे यांनी यांचे कौतुक केले.