31 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
नाशिक |
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा जनसन्मान यात्रा दौरा निमित्त कृषी मंत्री धनंजय मुंडे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी व आनंदाची घोषणा केली.
मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम लवकरच खात्यात जमा होणार आहे. 31 ऑगस्टपूर्वी त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली तेव्हा, त्यांनी प्रलंबित विम्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आज सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे आणि इतर अधिकारी यासमवेत बैठक घेतली असून. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव यांची उपस्थिती होती.
त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाआधारे आणि उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेले 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांना मिळाली. त्यानंतर कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले.