जळगाव -जालना रेल्वेमार्गासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय साडेतीन हजार कोटी निधीस मंजुरी
जळगांव |
अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी असलेल्या जालना- जळगाव ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत साडेतीन हजार कोटींचा निधी मंजुर करण्यात आला. या मंजुरीमुळे मराठवाडा- खान्देश जोडणारा दुवा निर्माण होणार आहे.
जालना- जळगाव या सुमारे १७४ किलोमीटरच्या टप्प्यासाठी ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचा प्रस्ताव खूप वर्षांपासून प्रलंबित होता. दोन्ही विभागातील प्रवाशांची ही आग्रही मागणी होती.
या कामासाठी ७ हजार १०५ कोटी ४३ लाखांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५० टक्के खर्च देणार आहे. त्यानुसार राज्याचा ३ हजार ५५२ कोटी ७१ लाखांचा खर्च राज्य सरकार उचलणार असून, त्यासाठी मंत्रिमंडळाने या निधीस मंजुरी दिली आहे.
जालना- जळगाव हा मराठवाडा आणि खानदेश विभागाला जोडणारा मार्ग जालना- राजूर- सिल्लोड- अजिंठा- जळगाव असा असेल. जळगावपासून अवघ्या ५५ किलोमीटरवर असलेल्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळ अजिंठा लेणीवरुन मार्ग जात असल्याने पर्यटनात भर पडले.त्याच प्रमाणे या मार्गावर पवित्र तीर्थक्षेत्र राजूर गणपतीही आहे. त्यामुळेही या रेल्वे मार्गाचे विशेष महत्त्व आहे.
या मार्गाद्वारे मराठवाड्याला थेट मुंबई, दिल्ली व कोलकत्ता या महत्त्वाच्या मार्गांशी जोडता येणार आहे.