करिअरजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रसंस्था

सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल – जळगावमध्ये दोन दिवसीय सहकार संमेलन संपन्न

जळगाव, दि. 7 जून २०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय सनदी लेखाकार संस्था (ICAI) – जळगाव शाखा व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय “सहकार संमेलनास” आज जळगाव येथे औपचारिक प्रारंभ झाला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २४(अ) अन्वये आयोजित हे संमेलन दिनांक ६ व ७ जून दरम्यान संपन्न झाले.

या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, जिल्हा उपनिबंधक श्री. गौतम बलसाणे, बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. राधेश्याम चांडक (भाईजी) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी ICAI जळगाव शाखेचे अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी सनदी लेखापाल संस्थेचा हा अभिनव उपक्रम असल्याचे सांगितले. त्यांनी जळगावला प्राप्त झालेल्या D+ MIDC झोनच्या मान्यतेच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांनी लघु व मध्यम उद्योगांना भांडवली पाठबळ पुरवण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी २०२५ हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केल्याची आठवण करून देत, जळगाव जिल्ह्यातील सहकार चळवळीच्या सक्षमीकरणासाठी ICAI च्या उपक्रमाचे कौतुक केले. सहकार ही केवळ आर्थिक नाही तर सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी सहकारी संस्थांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहनही केले.

संमेलनाच्या पहिल्या सत्रात निवृत्त सहनिबंधक (ऑडिट) श्री. तानाजी कवडे यांनी “सहकारी पतसंस्था/बँका – आर्थिक परिस्थिती विश्लेषण” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी सहकारी संस्थांच्या आर्थिक मूल्यांकनाच्या तांत्रिक बाबींचे विश्लेषण करताना सहकार आयुक्त कार्यालयाच्या NPA सर्कुलरचा संदर्भ दिला.

दुसऱ्या सत्रात श्री. अशोकजी महाजन (CEO, गोदावरी लक्ष्मी सह. बँक लि.) यांनी “परिणामकारक वसुली व त्यातील दक्षता” या विषयावर मार्गदर्शन करताना वसुली ही एक सामाजिक प्रक्रिया असल्याचे सांगितले. त्यांनी कायदेशीर तरतुदी व मानवी दृष्टिकोन यांचा समन्वय साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

तिसऱ्या सत्रात सी.ए. परीक्षित भदादे यांनी “सहकारी लेखापरीक्षण – नवीन अहवाल विश्लेषण व तयारी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी अलीकडील बदल, व्यवस्थापन मूल्यांकन, धोका विश्लेषण यांसारख्या बाबींवर प्रकाश टाकला.

या वेळी सहकार मार्गदर्शिका पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. संमेलनास ICAI जळगाव शाखेचे पदाधिकारी, सदस्य, सहकारी संस्था, पतसंस्था, बँकांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व लेखापरीक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button