मतदार यादीत नाव आणि नोंदणीसह इतर तपशील अद्ययावत करण्याचे आवाहन
जळगाव|
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने यावर्षीच्या दुसऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. यात मतदारांसाठी दावे आणि हरकतींसाठी दि. ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२४ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातंर्गत पात्र नवमतदारांच्या नोंदणीसह विद्यमान मतदारांसाठी मतदार यादीतील आपल्या तपशीलांमध्ये बदल, दुरुस्त्या, अद्ययावतीकरण करता येणार आहे. तरी सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घेण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वार केले आहे.
मतदार यादीत नाव तपासणे का गरजेचे :- नागरिक मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदार यादीत आपले नाव शोधतात. त्यांचे नाव मतदार यादीत आढळले नाही की, ते मताधिकाराला मुकतात. बऱ्याचदा मतदार त्यांनी आधीच्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मत दिले होते, तिथेच आपले नाव असेल, असे गृहीत धरून त्याच मतदान केंद्रावर जातात. मात्र मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेत त्यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर गेलेले असू शकते. या माहितीच्या अभावामुळेही मतदार यादीत आपले नाव नाही, असे समजून ते मतदानाला मुकतात. मतदार ओळखपत्रात नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक इ. वैयक्तिक तपशिलांत चुका असल्यास त्यात दुरुस्ती करण्यात यावी, मतदाराला असे ओळखपत्र एखाद्या ठिकाणी पुरावा म्हणून देण्यास अडचण येऊ शकते, म्हणून त्यांनी हे बदल करून घेतले पाहिजेत. दुसरे महत्वाचे म्हणजे मतदानाच्या वेळीही ओळख पटवण्यासाठी ते अडचणीचे ठरते त्यामुळेही हे बदल करून घेणे आवश्यक असते.