महाराष्ट्रताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया ; सांगितले दुर्घटनेचं कारण

सिंधुदुर्ग |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी ४ डिसेंबर रोजी मालवण जि. सिंधुदुर्ग येथे मोठ्या उत्साहात नौदल दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला होता. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं,मात्र हा पुतळा आज सोमवारी २६ ऑगस्ट दुपारी दीडच्या सुमारास कोसळला. त्यामुळे सरकारच्या कारभारावर जोरदार टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नौदलाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटलं आहे की गेल्या वर्षी ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनानिमित्त राजकोट किल्ल्यावर सिंधुदुर्गमधील नागरिकांना समर्पित अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र आज या पुतळ्याची जी काही हानी झाली आहे त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतंय. या दुर्दैवी अपघाताच्या कारणांचा त्वरित तपास करण्यासाठी, लवकरात लवकर या पुतळ्याची दुरुस्ती करण्यासाठी आणि पुन्हा एकदा त्याच ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील. त्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित विभागातील तज्ज्ञांसह चर्चा करण्यासाठी नौदलाने एक पथक तयार केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा पुतळा ही आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. तो पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पुतळ्याचं डिझाईन देखील नौदलानेच तयार केलं होतं. हा पुतळा कोसळल्याचं वृत्त समजल्यावर मी त्वरित तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की ही घटना घडली त्यावेळेला त्या भागात ४५ किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने सोसाट्याचा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं. मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की उद्या घटनास्थळी नौदलाचे अधिकारी जाणार आहेत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले आहेत. नौदलाचे अधिकारी व आमचे अधिकारी स्मारकाची पाहणी करतील व लवकरच पुतळ्याच्या उभारणीचं काम देखील सुरू केलं जाईल”.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button