अंतर्नाद प्रतिष्ठानच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडूमाती गणेश मूर्ती साकारली
भुसावळ |
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने अंतर्नाद प्रतिष्ठान, भुसावळने आयोजित केलेली शाडूमाती गणेश मूर्ती कार्यशाळा रविवारी लोणारी समाज मंगल कार्यालयात अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाली. या कार्यशाळेत इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या २४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाडूमातीचे गणपती बनवले. प्रत्येक विद्यार्थ्याला अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे भिजवलेले मातीचे गोळे मोफत देण्यात आले. यंदा उपक्रमाचे ४ थे वर्ष होते.
कार्यशाळेचे उदघाटन माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी आणि उदयोजक श्याम दरगड यांच्या हस्ते गणपतीची आरती करून करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांची जाणीव ठेवून, शाडूमातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा हा उपक्रम होता. “शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करु या” या संदेशाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचा वापर होतो, ज्यामुळे जलाशयांचे प्रदूषण वाढते. याच पार्श्वभूमीवर शाडूमातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचा प्रसार करणे, आणि पर्यावरण रक्षणासाठी अधिक लोकांना प्रेरित करणे हाच कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
कलाशिक्षक हितेंद्र नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनवण्याच्या कला आणि तंत्राची माहिती दिली. त्यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली, विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती तयार करताना शाडूमातीचा योग्य वापर कसा करावा, रंगसंगती कशी निवडावी, आणि मूर्तीची रचना कशी साकारावी याचे बारकावे शिकत गणेशाची मूर्ती साकारली.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प प्रमुख कुंदन वायकोळे, समन्वयक उमेश फिरके, सह-समन्वयक विपिन वारके आणि उपक्रम समिती सदस्य ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, अमितकुमार पाटील, प्रसन्ना बोरोले, जीवन महाजन, शैलेंद्र महाजन, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, समाधान जाधव, राहुल भारंबे, राजेंद्र जावळे, देव सरकटे, राजू वारके, प्रा. श्याम दुसाने, तेजेंद्र महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, ललीत महाजन, सचिन पाटील, मंगेश भावे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंद आणि उत्साह व्यक्त केला. शाडूमातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचा हा त्यांचा अनुभव त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. अनेक विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे वचन या कार्यशाळेत दिले.