रावेर तालुक्यात शेतात विद्युत तारा चोरी करणाऱ्या टोळीला अटक
जळगाव|
जिल्ह्यातील रावेर, फैजपूर, यावल, मुक्ताईनगर परिसरातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून शेतातील विद्युत तारा चोरीच्या घटनांनी त्रस्त होते. या घटनांचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून, त्यांनी मध्यप्रदेशातील एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने एकूण ४४ ठिकाणी विद्युत तारा चोरी केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये किमतीचा ऐवज आणि चोरीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.
रावेर, फैजपूर, यावल आणि मुक्ताईनगर भागातील शेतकरी विद्युत तारा चोरीमुळे त्रस्त होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या घटनांचा तपास करण्याचे आदेश दिले होते. पथक गेल्या दीड महिन्यांपासून या चोरीच्या घटनांमध्ये सामील असलेल्या संशयितांचा शोध घेत होते. तपासादरम्यान, मध्यप्रदेशातील नूरा मोरे आणि अनिल भेरसिंग मंडले या टोळीची माहिती मिळाली. पथकाने त्यांच्यावर सापळा रचून नूरा मोरे याला रंगेहाथ पकडले. त्याच्या साथीदारांनी मात्र घटनास्थळावरून पळ काढला.
नूरा मोरे याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने रावेर, फैजपूर आणि यावल परिसरातील ४४ ठिकाणी विद्युत तारा चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार, टोळीतील इतर साथीदार अनिल भेरसिंग मंडले, संजू चमार वास्कले, दिना मोरे आणि सावन उर्फ पंडू मोरे यांना देखील पथकाने अटक केली आहे. चोरीसाठी वापरलेली एमपी ६८ झेडसी २५४६ क्रमांकाची कार जप्त करण्यात आली आहे.
चोरलेली विद्युत तारा रावेर येथील भंगार विक्रेता यासीन हुसेन खान याच्याकडे विक्री केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार, भंगार विक्रेत्यालाही अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सखोलपणे सुरू असून, आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोहेकॉ महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली.