शहरातील रथोत्सवासाठी भाविकांचा जोरदार उत्साह.
पावसाच्या सरींचा वर्षावातही भाविकांचा ओसांडून वाहणारा उत्साह आणि ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय’ या जयघोषासह टाळ, चिपळ्यांचा निनादाने बुधवार (दि. 17) साजरा झालेल्या रथोत्सवामुळे अवघी पिंप्राळानगरी दुमदुमून गेली होती. आषाढी एकादशीनिमित्त पिंप्राळ्यातील विठ्ठल मंदिर संस्थान यांच्या तर्फे रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव शहरात बुधवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध संस्था, शाळा, महाविद्यालयांकडून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंप्राळा नगरीत विठ्ठल मंदिर संस्थानच्या 149 वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरात सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी ‘माऊली..माऊली’ चा जयघोष ऐकायला येत होता. शाळा-महाविद्यालय तसेच विविध संस्थांकडून दिंड्यांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.