“उमेद” बचत गटातील महिलांच्या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करावा: भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे
यावल |
भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी “उमेद” योजनेतील बचत गटातील महिलांच्या कामबंद आंदोलनास पाठिंबा दर्शवित, त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याची मागणी ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांना पत्राद्वारे केली आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या “उमेद” योजनेत मोठ्या संख्येने प्रेरिका आणि विविध प्रकारच्या समुदाय संसाधन व्यक्ती सेवा देत आहेत. यामध्ये ७ लाख महिलांचा समावेश आहे, आणि त्यांच्या माध्यमातून ८४ लाख परिवारांना जोडले गेले आहे.
महिलांचा विकास आणि आत्मनिर्भरता समाजाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत; त्यामुळे “उमेद” योजनेत कार्यरत असलेल्या माता भगिनींच्या पुढील मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
“उमेद” योजनेसाठी एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात यावा. समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) म्हणून कार्यरत असलेल्या ताईंना “ग्रामविकास सेवक” म्हणून पद बहाल करण्यात यावे. उमेदमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांना कायम शासन सेवेत समाविष्ट करण्यात यावे. “उमेद” अभियान ग्रामीण विकास आणि मातृशक्तीच्या सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने हे अभियान अविरत चालू ठेवण्यात यावे.
भाजपा जिल्हाध्यक्षांनी महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी पत्राद्वारे ग्रामविकास मंत्री यांना केली आहे.