ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन
मुंबई |
मराठी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅन्सरशी लढा देत त्यांनी गेल्या वर्षी या आजारावर यशस्वी मात केली होती, मात्र पुन्हा या गंभीर आजाराने त्यांना
गाठल्याने त्यांचे निधन झाले. काही काळापूर्वी अतुल परचुरे कॅन्सरने त्रस्त होते, परंतु त्यांनी जिद्दीने या आजारावर मात करत पुन्हा आपल्या करिअरला
सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी विविध मराठी आणि हिंदी कार्यक्रमांतून प्रेक्षकांच्या समोर पुनरागमन केले होते. त्यांच्या या यशस्वी लढाईला सलाम करत अनेक मराठी कलाकारांनी एका विशेष कार्यक्रमात त्यांना सलामी दिली होती.
अतुल परचुरे यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तसेच, त्यांनी अनेक नाटकांतून देखील प्रेक्षकांची मनं जिंकली.
त्यांच्या अचानक निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांचे जाणे ही चित्रपटसृष्टीसाठी मोठी हानी ठरली आहे.