मुख्यमंत्री शिंदे यांनी केली ४५ जणांची उमेदवारी
जळगाव |
राज्यभरामध्ये निवडणुकीचे वारे सुरू झाले आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी रात्री ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री हे त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढणार असून जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील यांचेसह चोपड्यातून चंद्रकांत सोनवणे यांना तर एरंडोल पारोळ्यातून अमोल चिमणराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार दि. २२ पासून उमेदवारी अर्ज विक्री सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्यांचा पारंपारिक मतदारसंघ कोपरी पाचपाखडी येथून निवडणूक लढणार आहे. खानदेशामध्ये धुळे जिल्ह्यातील साक्री येथून मंजुळा गावित, चोपडा येथून विद्यमान आ. लता सोनवणे यांच्याऐवजी त्यांचे पती प्रा.चंद्रकांत सोनवणे यांना तर एरंडोल येथून विद्यमान आ. चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
त्याच प्रमाणे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातून चंद्रकांत पाटील तर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातून किशोर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली.