ताज्या बातम्याक्राईमजळगावमहाराष्ट्रराजकारण
उमेदवारवर गोळीबार प्रकरण : संशयित अटकेत
जळगाव
मुक्ताईनगर-बोदवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर राजूर गावात मंगळवारी दुपारी प्रचारादरम्यान गोळीबार केल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली. दीपक शेजोले (येवती, ता. बोदवड) व आयूष ऊर्फ चिकू गणेश पालवे (१९, नांदगाव, ता. बोदवड) अशी संशयितची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. शिरसाड, चिंचखेडा, कोल्हाडी येथे प्रचार आटोपल्यानंतर बोदवडला प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. तेथून सोनवणे हे राजूर येथे दुपारी पोहोचले. त्याचवेळी ताफ्यातील वाहनाच्या दिशेने तीन हल्लेखोरांनी दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात कुणालाही दुखापत झाली नाही.