दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ जामनेर शहरात एकनाथराव खडसे, नितेश कराळे गुरुजी यांची राहणार उपस्थिती
जामनेर |
महाविकास आघाडीचे
आणि शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी ३ वाजता जामनेर शहरातील बोहरा स्कुलच्या प्रांगणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, नितेश कराळे गुरुजी, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, पारस ललवाणी आदी नेते उपस्थित राहणार आहे.
गिरीश महाजन यांच्या विरोधात दिलीप खोडपे सर यांनी दंड थोपटले असून एकेकाळी एकमेकांचे मित्र असलेल्या या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांच्या काट्याच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जामनेर विधानसभा मतदार संघातून ६ वेळा निवडून आलेले गिरीश महाजन यांचा जामनेर मतदार संघ हा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले दिलीप खोडपे सर यांचे गिरीश महाजन यांच्या समोर आव्हान उभे राहिले आहे. दिलीप खोडपे सर यांना जामनेर तालुक्यातून मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
शरद पवार यांच्या आज होणाऱ्या जाहीर सभेत ते गिरीश महाजन यांच्यासह भाजपातील ज्येष्ठ नेत्यांवर आपल्या भाषणातून काय टीका करतात याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले असून त्यांच्या जामनेरातील सभेकडे जिल्हाच नव्हे तर राज्याचे देखील लक्ष लागले आहे.