महात्मा फुले मार्केटच्या हॉकर्सची आयुक्तांना निवेदन
जळगाव |
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट येथे हॉकर्सवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती. दरम्यान राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार अंमलबजावणी करून पथवविक्रेता समिती गठीत करीत हॉकर्सला व्यवसाय करण्यास परवानगी देऊन न्याय द्यावा अशी मागणी मंगळवारी दि. ३० जुलै रोजी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. जोपर्यंत पथविक्रेता समिती गठीत होत नाही तोवर व्यवसाय करू द्यावा अशीही मागणी यावेळी हॉकर्स बांधवानी केली आहे.
काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने महात्मा ज्योतिबा फुले मार्केटमध्ये हॉकर्स विरोधात कारवाई केली. अतिक्रमण करतात म्हणून त्यांना बाहेर काढले. आता हॉकर्स युनियनने मंगळवारी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली. निवेदन देऊन त्यांना गाऱ्हाणे सांगितले. हॉकर्स बांधवांवर व्यवसाय बंद झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. दवाखाना, शिक्षणाचा खर्च करताना अडचणी येऊन राहिले आहेत.
हॉकर्स बांधवांना राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार अंमलबजावणी करून मिळावी त्याचप्रमाणे पथविक्रेता समिती गठीत करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे. राज्य शासनाचा नगर विकास विभागाचा २१ सप्टेंबर २०१३ रोजीचा जीआर निवेदनासोबत जोडण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देताना अध्यक्ष नंदू पाटील, उपाध्यक्ष सय्यद सादिक, सचिव सचिन जोशी, भरत पवार, बापू चौधरी, रवी चौधरी, लल्ला गवळी, ज्ञानेश्वर शिवदे, इरफान शेख, वसंत गवळी, पप्पू ठाकूर, शुभम सोनार, मनोज चौधरी, प्रवीण जोशी, अब्दुल कादिर शेख आयुब, ज्ञानेश्वर चौधरी, मुक्तार शेख, नितीन सोनवणे, अशोक कटारिया, विजय कटारिया, सय्यद रईस सय्यद हनीफ, जमील शेख, दिनेश मोतीरामाणी, दीपक पाटील, फिरोज खान, राहुल सपकाळे आदी हॉकर्स उपस्थित होते.