शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांची मागणी.
पाचोरा |
शहरातील खराब व चिखलमय रस्ते तातडीने दुरुस्त करावे, अशी मागणी शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पाचोरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा शहर हद्दीत असलेल्या अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. यातील बहुतेक भागात अगोदर केलेले वयाच्या अगोदरच म्हातारे झाले. कदाचित रस्ते बनवताना ठेकेदारांना पूर्ण रक्कम वापरता आली नसावी. त्यांच्या कामाचा दर्जा मेंटेन ठेवण्याची जबाबदारीचे व कर्तव्याचे पालन नगर परिषदेच्या कर्मचारी व अधिकारी यांनी चांगल्या प्रकारे केले नसावे. तसेच लोक प्रतिनिधींनी त्याकडे नागरिकांच्या कल्याणाच्या ऐवजी व्यक्तीगत हित आणि नफ्याच्या दृष्टीने जास्त बघितले असावे. म्हणूनच हे रस्ते लवकर खराब झाले आहेत.
एकीकडे स्वयंघोषित कार्यसम्राट ही पदावली स्वतःला लावून विकासाच्या गप्पा मारणाऱ्या विद्यमान आमदारांनी या रस्त्यांची दुरवस्ता पाहण्यासाठी स्वतः कधी प्रयत्न केले का, असा प्रश्न आम्हा नागरिकांना पडतो, असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनासोबत जोडलेल्या फोटोतील आणि नमूद भागातील तसेच या व्यतिरिक्त इतर भागातील राहिलेले, नादुरुस्त, पूर्णतः खराब झालेल्या सर्वच रस्त्यांचे तातडीने चांगल्या दर्जाचे काम करावे. या रस्त्यांच्या कामांवर शासन निर्णयानुसार डिफॉल्ट लायबलीटी पिरीयडचे बोर्ड ठेकेदाराच्या व ठेक्याच्या संबंधातील विस्तृत माहितीसह लावण्यात यावे.
निवडणुकीच्या अगोदर या रस्त्यांची कामे करावीत अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना निवेदन सादर करताना शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी, उध्दव मराठे, शरद अरुण पाटील, संदीप जैन, अनिल सावंत, दिपक पाटील, अॅड. अभय पाटील, शशी पाटील यांच्यासह शिवसेना व युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.