नूतन मराठा महाविद्यालयात ग्रंथदिंडीचे आयोजन

जळगाव |खान्देश लाईव्ह न्यूज|
नूतन मराठा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाच्या वतीने ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांच्याहस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखीचा शुभारंभ करण्यात आला. “ज्ञानोबा माऊली तुकाराम” आणि “माय मराठी चिरायू होवो” या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.महाराष्ट्रात २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची आज जयंती. या वर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा आनंद द्विगुणित झाला आहे कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर हा दर्जा आपल्या मराठी भाषेला दिला आहे. भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे आणि जगात ८३ दशलक्ष पेक्षा अधिक लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषेतही सुमारे ४० हून अधिक बोली भाषांचा समावेश आहे.