PhD Admission : पीएचडी प्रवेशासाठी 6 हजाराहून अधिक अर्ज सादर तर 10 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यापीएचडी प्रवेशासाठी (PhD Admission) विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 6 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील 4 हजार 857 विद्यार्थ्यांचे पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेचे शुल्क प्राप्त झालेआहे. पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा येत्या 24 ऑगस्ट रोजी घेतली जाणार असून पीएचडी प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी येत्या 10 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये आणि संलग्न महाविद्यालयातील संशोधन केंद्रातील सुमारे 1200 जागांसाठी पीएचडी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. विद्यापीठातर्फे 10 जुलैपासून पीएचडी प्रवेशासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली, आतापर्यंत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी 2204 अर्ज प्राप्त झाले असून वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेसाठी 926 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर मानव्य विज्ञान विद्याशाखेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1348 आहे. तसेच 379 आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पीएचडी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि प्रदेशात नामांकित विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्राप्त व्हावी, यासाठी अनेक विद्यार्थी पीएचडी प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. आतापर्यंत सहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असली तरी 4 हजार 857 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जसह परीक्षा शुल्क भरले आहे. अद्याप परीक्षा अर्ज न भरलेल्या आणि शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना येत्या 10 ऑगस्टपर्यंत पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा येत्या 24 ऑगस्ट रोजी घेतल्यानंतर निकाल 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.