प्राध्यापक पदासाठी “सेट”अर्ज प्रक्रिया सुरू
पुणे |
प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची (सेट) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाकडून आयोजित केली जाणारी चाळीसावी (४० वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवारी, १५ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी (गोवा) या केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
सेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर https://setexam.unipune.ac.in जाऊन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज विहित नमुन्यातच भरावयाचा आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्जप्रक्रिया २४ फेब्रुवारी, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू होणार आहे. तर १३ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सेट परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. तर ५०० रू. विलंब शुल्कासहीत अर्ज भरण्याचा कालावधी दि. १४ मार्च, २०२५ सकाळी ११.०० वाजल्यापासून दि. २१ मार्च, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असेल.