आदिवासी कोळी जातप्रमाणपत्रासाठी जगन्नाथ बाविस्कर यांचे वर्षभरात सात वेळा आंदोलन
चोपडा |
राज्यातील आदिवासी कोळी जातीच्या लोकांना नोंदीनुसार टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी (अनु. जमाती) चे जातप्रमाणपत्र मिळावे, याकरिता चोपडा महर्षी वाल्मिकी मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बु.) यांनी एका वर्षात तब्बल सात वेळा आंदोलन, उपोषण, सत्याग्रह, मोर्चा काढून आपल्या कोळी बांधवांना शेकडो दाखले मिळवुन दिलेले आहेत. कोळी लोकांना टोकरे कोळीचे दाखले मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलन काळात त्यांनी आपली नोकरी शेती व्यवसाय बाजूला सारून भावनेने समाजसेवा केलेली आहे. त्यांना सर्वस्तरातील कोळी समाज बांधवांचा पाठिंबा होता. त्यांनी हे आंदोलन उपोषण करतांना शांतता कायदा व सुव्यवस्था राखूनच केल्याने संबंधित विभागासह ऑनलाइन व प्रिंट मीडियाचेही सहकार्य लाभले. परंतु जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी सहकार्य न केल्यामुळे कोळी लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. यापुढेही जातप्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रासाठीची लढाई सुरू राहील, पर्यायाने तीव्र आंदोलन करणार असल्याचेही आंदोलनकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी सांगितले आहे.