मूकमोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार; नागरिक मंच आणि सहयोगी संस्थांच्या बैठकीत सविस्तर नियोजन
नागरिक आणि संस्था व संघटनांचा सहभाग

जळगांव ,दि.२ मे २०२५ |खान्देश लाईव्ह न्यूज|
२८ पर्यटकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी निषेधासाठी शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी जळगाव येथे जळगाव नागरिक मंच व सहयोगी सुमारे 100 वर संस्था व संघटनांनी मूकमोर्चा आयोजित केला आहे. या मूकमोर्चाच्या नियोजनासाठी आज सर्व आयोजकांची सविस्तर बैठक झाली. मूकमोर्चात शहरातून सुमारे 10 हजार नागरिक सहभागी होतील, असा अंदाज सहयोगी संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला. या मूकमोर्चात पोलीस व जिल्हा प्रशासनातर्फे निर्धारित सर्व नियम व अटींचे पालन करुन शांततेत मूकमोर्चा यशस्वी करण्याचे ठरले.
मूकमोर्चाचा प्रारंभ सकाळी 7 वाजता शिवतीर्थ येथून होईल. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातील मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करुन मूकमोर्चास सुरुवात होईल. हा मूकमोर्चा गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू पुतळा, शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, जिल्हा सामान्य रूग्णालय, पांडे डेअरी चौक, टपाल कार्यालय या मार्गाने स्वातंत्र्य चौकात पोहचेल. तेथे काही काळ ठिय्या आंदोलन केल्यानंतर जिल्हाप्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांना निवेदन स्विकृतीसाठी आंदोलन स्थळी विनंती करून बोलावले जाईल.
मूकमोर्चातील प्रतिनिधी जे निवेदन सादर करतील त्यातील आशय आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आला. त्यानुसार पहलगाम (काश्मीर) येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या २८ पर्यटकांच्या हत्येचा निषेध करणे, केंद्र सरकारने या दहशतवादी घटनेचा सर्व स्तरांवर तपास करुन शेजारील राष्ट्रातील दहशतवाद्यांची घुसखोरी रोखावी. भारत विरोधी देशाची सामरिक आणि व्यापार विषयक कोंडी करावी, या मागण्या केलेल्य आहेत. याबरोबरच जळगाव शहरातही पाकिस्तानमधील धार्मिक अजेंडा पुढे रेटू पाहणार्या राष्ट्रविरोधी प्रवृत्तींवर लक्ष ठेऊन वेळीच कार्यवाही करावी. तसेच जळगावमध्ये अवैध शस्त्र बाळगणार्या समाजकंटकांच्या विरोधात कोंबिंग ऑपरेशन सुरु करावे, अशी ही मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.
मूकमोर्चाच्या संयोजनासाठी आतापर्यंत १०० वर संस्था- संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. त्यातील काही संस्था- संघटना अशा- सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, रोटरी परिवार जळगाव, इंडियन मेडिकल असोसिएशन जळगाव, क्रेडाई जळगाव, जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स.सोसायटी), सकल जैन श्री संघ जळगाव, गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव, लाडशाखीय वाणी समाज जळगाव, युवाशक्ती फाऊंडेशन जळगाव, टेन्ट हाऊस असोसिएशन जळगाव, नारीशक्ती बहुउद्देशिय संस्था जळगाव, श्री जैन युवा फाऊंडेशन जळगाव, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) जळगाव, जळगाव इंडस्ट्रीज असोसिएशन (जिंदा) जळगाव, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ जळगाव, दि ग्रेन किराणा ॲण्ड जनरल मर्चंट असोसिएशन (दाणाबाजार असोसिएशन) जळगाव, एकता रिटेल किराणा व्यापारी असोसिएशन जळगाव, जळगाव डिस्ट्रीक्ट मेडीसीन डिलर्स असोसिएशन जळगाव, एल. के. फाऊंडेशन जळगाव, शिवाजी नगर मित्र मंडळ जळगाव, भारतीय जैन संघटना जळगाव शहर, जळगाव जिल्हा मुर्तीकार संघटना, रौद्र शंभो बहुउद्देशीय संस्था जळगाव, भगवे स्वराज्य सेना जळगाव, शिववंदन फाऊंडेशन जळगाव, धर्मरथ फाऊंडेशन जळगाव, श्री रामदुत हनुमान सांस्कृतिक व क्रीडा मंडळ जळगाव, सत्संग भजन मंडळ जळगाव, दाधीच नवयुवक मंडळ जळगाव, भारत विकास परिषद जळगाव, ओम योगा क्लासेस जळगाव, ओम साई बहुउद्देशीय संस्था जळगाव, अखिल भारतीय सफाई मजदूर संघ जळगाव जिल्हा शाखा, शिवा फाऊंडेशन जळगाव, श्री गणाधीश फाऊंडेशन जळगाव, प्रबोधन संस्था जळगाव, स्वरवेध फाऊंडेशन जळगाव, लोकमित्र फाऊंडेशन जळगाव, जनमत प्रतिष्ठान जळगाव, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना जळगाव, प्रयास बहुउद्देशीय विकास संस्था पिंप्राळा जळगाव, शिवसेना जळगाव जिल्हा, जळगाव सिव्हिल इंजिनिअर जळगाव, जळगाव डिस्ट्रिक अकाऊंटन्स् असोसिएशन जळगाव, गोदावरी फाऊंडेशन जळगाव, जळगाव शहर व तालुका माहेश्वरी सभा जळगाव, आंतरराष्ट्रीय बजरंग दल जळगाव, जवान फाऊंडेशन जळगाव या आहेत. याशिवाय जळगाव शहरातील व जिल्ह्यातील ज्या संस्था- संघटनांना मूकमोर्चास पाठिंबा द्यावयाचा आहे त्यांनी शनिवारी थेट मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.
शनिवार, दि. २ मे २०२५ रोजी जळगाव शहरातील नागरिक मूकमोर्चात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाचा विषय अत्यंत गंभीर असल्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेतील आणि उपनगरांमधील दुकाने, प्रतिष्ठाने, व्यवसाय आदि व्यवहार अर्धा दिवस अर्थात सकाळी ७ते दुपारी ३ यादरम्यान बंद ठेवणे आवश्यक आहे. व्यवहार बंद ठेवत असताना मोर्चास पाठिंबा दर्शविणे हा हेतू तर आहेच मात्र, बंद काळात व्यक्तिगत स्वरुपात मूकमोर्चात सहभागी होणे हे सुद्धा आवश्यक आहे. बंदचे आवाहन करण्यासाठी कोणतीही संस्था/संघटना प्रत्यक्ष येऊन आपणास विनंती करणार नाही अथवा व्यवहार बंद करण्यासाठी आग्रहसुद्धा करणार नाही.
जळगावमधील नागरिकांना आवाहन
मूकमोर्चा शिवतीर्थ ते स्वातंत्र्य चौक दरम्यान निघणार आहे. या मोर्चात सहभागी होणार्या नागरिकांसाठी संवेदनशील व जागरुक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तसेच मूकमोर्चात कोणत्याही घोषणा देऊ नयेत. आपआपसात वाद-विवादाचा कोणताही प्रसंग निर्माण करु नये. शहरातील ज्या समूहांना या मोर्चास पाठिंबा दर्शवायचा आहे त्यांनी त्यांच्या घरावर काळे झेंडे लावून निषेध दर्शवावा, असे आवाहन जळगाव नागरिक मंचच्या बैठकीत करण्यात आले.
या मूकमोर्चासाठी १०हजार काळे मास्क, ४ हजाराहून अधिक काळ्या रिबीन, २०० काळे झेंडे व ३०० निषेध फलक तयार करण्यात आले आहेत.
मूकमोर्चा संयोजनात नागरिकांसाठी जल आणि आकस्मिक आरोग्य व्यवस्था पुरवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. तसेच मूकमोर्चाचे संचालन करण्यासाठी १०० वर युवकांचे पथक युवाशक्ती फाऊंडेशन आणि शहरातील एनसीसीच्या युवकांनी तयार केले आहे. याबरोबरच जळगाव जिल्हा औषध विक्रेता संघटनेतर्फे नागरिकांना जल पुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. मूकमोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध संस्था व संघटना पुढे सरसावल्या आहेत. मूकमोर्चात सहभागी होणार्यांना काळी मुखपट्टी (मास्क) हे भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे देण्यात येतील. मूकमोर्चात सहभागी होणार्या पुरुषांनी शक्यतो काळा किंवा पांढरा शर्ट घालावा. तसेच महिलांनी काळी वा पांढरी साडी परिधान करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.