दहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहिर
जळगाव, ३०एप्रिल२०२५|खान्देश लाईव्ह न्यूज|
पोलिस प्रशासनात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह दिले जाते. जिल्ह्यातील दोन सहा. पोलीस उपनिरीक्षकांसह आठ अंमलदार असे एकूण दहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहिर झाले आहे. २०२३ सालासाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलिस दलात कार्यरत असताना केलेल्या उत्तम कामगिरी व प्रशंसनीय सेवेबद्दल हे सन्मानचिन्ह दिले जाते. राष्ट्रपतींच्या पोलिस पदक, शौर्यपदकानंतर याबाबतची घोषणा केली जाते. जिल्हा पोलिस दलातील या १० जणांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर आपली छाप पाडली आहे. गुन्हे उकलणे, सार्वजनिक सुरक्षा आणि समुदाय सेवेत त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. राज्यभरातून २०२३ साठी एकूण ८०० पोलिसांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाले असून, त्यात उत्तर महाराष्ट्रातील ६२ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यातून यांचा समावेश
जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलिस निरिक्षक शामकांत पाटील, जग्गनाथ पाटील, पोलिस हवालदार रमेश शंकर कुमावत, हरिश मधुकर कोळी, स्थानिक गुन्हे शाखेतील जितेंद्र राजाराम पाटील, गोरखनाथ रामभाऊ बागुल, विनोद बळीराम पाटील, दिलीप लक्ष्मीकांत कुलकर्णी, आशिष प्रतापराव चौधरी व पोलिस शिपाई जागृती चंद्रशेखर काळे यांचा समावेश आहे.