महापालिकेचे माजी नगरसेवक संजय रामदास पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश
धुळे |
महापालिकेचे माजी नगरसेवक संजय रामदास पाटील मांनी २७ ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांनी पक्ष सोडण्याची भूमिका सविस्तरपणे पक्षाला आणि माध्यमांना सांगितली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करताना संजय पाटील म्हणाले, देशभरातील बेरोजगारी, महागाई, चीनचे भारतीय भूमीवरील कब्जा, देशातील वाढती धार्मिक आणि जातीय अशांतता तसेच आदिवासी, दलित आणि महिलांवरील हिंसाचार; राज्यपातळीवरील महाराष्ट्रातील उद्योगांचे गुजरातला स्थलांतर, दूध आणि शेतमालाचे सातत्याने पडणारे बाजारभाव, वाढती गुंडगिरी तसेच धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांना शासकीय अभय आदी विषयावर आवाज उठवणे हे एक
जागरूक नागरिक म्हणून माझे आद्य कर्तव्य मानतो. ज्या धर्मनिरपेक्ष,सर्वसमावेशक आणि एकात्मतेच्या तत्व यावर भारतीय लोकशाही तरली आहे; तिच्यावर होत असलेल्या शासन पुरस्कृत हल्ल्याच्या विरोधात भूमिका म्हणून मी राष्ट्रवादी काग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. संजय पाटील यांनी पुरोगामी महाराष्ट्रचे लढवये लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याहस्ते ६ सप्टेंबरला पक्षाच्या बेलॉर्ड इस्टेट, मुंबई येथील मुख्यालयात शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. धुळे जिल्ह्यातील संदीप बेडसे, धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे तसेच पुणे शहराध्यक्ष रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, एन. सी. पाटील, सौ. कल्पना सुनील महाले, अण्णा सूर्यवंशी, नंदू यलमागे, नवाब बेग, लल्लू अन्सारी यांची उपस्थिती लाभली.