मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन
दिल्ली |
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे दीर्घ आजाराने ७२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना फुफ्फुसाच्या संसर्गाचा त्रास होता आणि ते दीर्घकाळ आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी संध्याकाळी ३:०५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सीताराम येचुरी यांना एम्सच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. माकपाने मंगळवारी दिलेल्या निवेदनात सांगितले होते की, ७२ वर्षीय येचुरी यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते आणि त्यांच्यावर श्वसन नलिकेच्या संसर्गावर उपचार सुरू होते. १९ ऑगस्ट रोजी त्यांना छातीच्या संसर्गासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. अलीकडेच त्यांच्यावर मोतीबिंदूच्या ऑपरेशनचे उपचार देखील झाले होते.
सीताराम येचुरी यांचा जन्म 12 ऑगस्ट 1952 ला मद्रास (चेन्नईत) एका तेलुगू भाषिक परिवारात झाला होता. त्यांचे वडील सर्वेश्वर सोमयाजुला येचुरी हे आंध्र प्रदेश राज्य रस्ते परिवहन विभागात इंजिनियर होते. तर त्यांच्या आई कल्पकम येचुरी एक सरकारी अधिकारी होत्या.
सीताराम येचुरी यांनी नवी दिल्लीच्या प्रेसिडेंट्स एस्टेट स्कुलमध्ये शिक्षण घेतलं होतं. तसेच त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या उच्च माध्यमिक परीक्षेत भारतात पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाच बीएचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर दिल्लीतील जेएनयू येथे एम.ए. अर्थशास्त्रचं शिक्षण घेतलं होतं. आणीबाणीच्या काळात जेएनयूमधील अटक होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये येचुरी देखील होते.
सीताराम येचुरी २०१५ मध्ये प्रकाश करात यांच्या नंतर सीपीएमचे महासचिव झाले होते. त्यांनी हरकिशन सिंग सुरजीत यांच्यासोबत काम करून राजकीय अनुभव घेतला होता. १९७४ मध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) मध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी १९७५ मध्ये पक्षाचे सदस्यत्व मिळवले आणि त्यानंतर आपल्या राजकीय कारकिर्दीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.सीताराम येचुरी यांच्या निधनावर विविध पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही शोक व्यक्त केला आहे.