एमपीएससी परीक्षेत मोठा बदल !
एमपीएससीच्या गट-ब व गट-क सेवा पूर्व परीक्षा वेगवेगळ्या होणार ?
मुंबई |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क संवर्गातील (वाहनचालक वगळून) पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भात शासन निर्णय झाला होता. या शासन निर्णयानुसार शासनाच्या विविध विभागातील गट ब (अराजपत्रित) व गट क या सेवेतील विविध संवर्गाची भरती प्रक्रिया आयोगामार्फत केली जाणार आहे.
एमपीएससीची तयारी
करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. काही दिवसापूर्वी आयोगाने याचे परिपत्रक काढले आहे. आता महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा एकत्र न होता वेगवेगळ्या होणार आहेत. या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा – परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणेसंदर्भात आयोगाकडून दिनांक १ ऑगस्ट, २०२२ रोजी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा परीक्षेसाठी दिनांक १९ जानेवारी, २०२३ रोजी परीक्षा योजना प्रसिद्ध करण्यात आली होती. या परीक्षा योजनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ करीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन दोन्ही सेवेची संयुक्त पूर्व परीक्षा प्रथमतः आयोजित करण्यात आली होती. परंतु, त्या परीक्षेच्या निकालप्रक्रियेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणी व उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे व त्यामुळे निकाल प्रक्रियेस होणारा विलंब इत्यादी बाबी विचारात घेऊन सदर परीक्षा योजनेमध्ये सुधारणा करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. त्याबद्दल निर्णय झाला असून आता परीक्षा पद्धत बदलण्यात आली आहे.