राजकारणताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीच्या वतीने धुळे विधानसभा निवडणुक लढवणार – मा.आ.अनिल गोटे

धुळे |
धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून आपण महाविकास आघाडीच्या वतीने निवडणुक लढवणार, अशी घोषणा शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी काल कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत केली. या बैठकीत त्यांनी शिवसेना (उबाठा) नेते खा.संजय राऊत यांच्याशी झालेल्या भेटीचे आणि चर्चेची माहिती देत आपली उमेदवारी ही सत्ताधारी महायुतीच्या विरुध्द महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल असे संकेत दिले.
विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या २४ तासात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्ताधारी भाजप महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा थेट सामना यंदाच्या निवडणुकीत होणार असे मानले जात आहे. या पार्श्‍वभुमिवर धुळे शहर विधानसभा निवडणुकीत लोकसंग्रामचे सर्वेसर्वा आणि धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे उमेदवारी करणार काय, आणि केली तर कोणत्या आघाडी व पक्षाकडून करणार याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतीच त्यांनी धुळे दौर्‍यावर आलेल्या खा.संजय राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे अनिल गोटे शिवसेना उबाठा पक्षातर्फे विधानसभा लढणार अशी जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान काल रविवारी अनिल गोटे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि समर्थकांची एक व्यापक बैठक कल्याण भवन येथे घेतली.
या बैठकीत मा.आ.अनिल गोटे यंानी मार्गदर्शन करतांना धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून आपण महाविकास आघाडीच्या वतीने निवडणुक लढवणार, अशी घोषणा केल्याची माहिती गोटे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. कोणत्या पक्षातर्फे लढणार हे मात्र स्पष्ट केले नसले तरी शिवसेनेचे खा.संजय राऊत यांच्याशी झालेल्या भेटीविषयी माहिती दिली. तसेच धुळे शहराच्या प्रलंबित विकासाचे प्रश्‍न आणि रेल्वे मार्गावर देखील भाष्य केले. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, पुर्ण ताकदीने आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आणि विजय खेचून आणणारच असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला तेजस गोटे, विजय वाघ, दिलीप सांळुखे, सलीम लंबू, प्रशांत भदाणे, अनिल चौधरी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button