भाजप-उबाठाच्या माजी महापौरांची बंडखोरी
जळगाव |
जळगाव शहर मतदारसंघात भाजपकडून आमदार सुरेश भोळे यांना, तर शिवसेना ठाकरे गटातून माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली असून, या दोन्ही उमेदवारांना पक्षातून बंडखोरीचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. भाजपचे माजी उपमहापौर डॉ. अश्विन सानवणे आणि ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी अपक्ष उमेदवारीची घोषणा करीत बंड पुकारले आहे.
जळगाव शहर मतदारसंघात विद्यमान आमदार सुरेश भोळे महायुतीचे उमेदवार असून, त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. मा
परंतु भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी आणि माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांनी तिकीट नाकारल्याने अपक्ष उमेदवारी करणार असल्याची घोषणा नुकतीच पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, मागील ३० वर्षांपासून आपण भाजपचे काम करीत असून, भाजपकडे विधानसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने विचार केला नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवणारच, अशी भूमिका डॉ. सोनवणे यांनी मांडली. विद्यमान आमदारांनी दहा वर्षांत शहरात कोणतीही ठोस विकासकामे केली नसल्याचा घरचा अहेरही त्यांनी दिला. पक्षाने आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून त्यांना उमेदवारी दिल्यामुळे अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्याचे सोनवणे म्हणाले. महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून जयश्री महाजन यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ठाकरे गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून, त्यांनी शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.