विधानसभा राजकीय प्रचार करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करा
पुणे |
राज्यातील सर्व अकृषी
विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारकामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास, विद्यापीठ व महाविद्यालयांनी शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. परंतु शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचारी वर्गाला कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर प्रचारकार्यात सहभागी होता येणार नाही.
यासंदर्भात डॉ. देवळाणकर यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलसचिव आणि सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयाला परिपत्रक
पाठविले आहे. या परिपत्रकानुसार आचारसंहिता पालनसंदर्भातील दि. २० मे २०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सामायिक परिनियम अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीतील तरतुदी लागू करण्यात आले आहेत.
या आदेशामुळे विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इच्छा असूनही राजकीय पक्षांच्या निवडणूक कार्यात सहभाग घेता येणार नाही. त्याचप्रमाणे स्वतःच्या शैक्षणिक संस्था असल्या तरी संबंधित उमेदवाराला आपल्या शैक्षणिक संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वापर निवडणुकीच्या कामात करता येणार नाही.