स्फोटात ॲम्बुलन्स जाळून खाक
जळगाव
एरंडोल येथील शासकीय रुग्णालयातून एका बाळंतीण महिलेला तिच्या बाळासह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणताना रुग्णवाहिकेत स्पार्किंग होऊन पेटली आणि त्यातील एका ऑक्सिजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. बुधवारी रात्री ९.३० वाजता दादावाडीजवळील उड्डाणपुलावर ही घटना घडली. रुग्णवाहिका (क्र. एमएच १४ सीएल ७९१) चालक राहुल पाटील याला वेळीच हा धोका लक्षात आल्याने त्याने या महिलेसह तिचे बाळ, दोन नातलग आणि डॉक्टरांना खाली उतरवले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. चालकाच्या या दक्षतेचे कौतुक करण्यात येते आहे.
आठच दिवसांपूर्वी म्हणजे ५ नोव्हेंबरला भुसावळ रोडवर कारमध्ये गॅस भरताना झालेल्या भीषण स्फोटाने शहर हादरेले होते. त्यानंतर बुधवारी ही दुसरी भीषण घटना घडली आहे. एरंडोलहून येणारी ही रुग्णवाहिका (१०८ क्रमांकाची सेवा) रात्री उड्डाणपुलावर येताच
कारमध्ये स्पार्किंग होऊन आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. बाळंतीण महिला मनीषा रवींद्र सोनवणे, तिचे बाळ, दोन नातलग आणि डॉक्टर रफिक अन्सारी यांना खाली उतरवले. त्यानंतर गाडीतील ऑक्सिजनचे तीन सिलिंडर काढण्याचा प्रयत्नही सुरू केला. त्यामधील एक सिलिंडर बाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र, गाडीची आग वाढल्याने अन्य दोन सिलिंडर त्यांना काढता आले नाहीत. त्यामुळे काही क्षणात त्यातील एका ट्रीय सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की रुग्णवाहिकेच्या चिंधड्या उडाल्या. हवेत ५० न फुटांहून अधिक उंच उडालेले रुग्णवाहिकेचे पत्रे पुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडवर जाऊन पडले. त्यात कोणीही जखमी झालेले नाही.