पुणे विद्यापीठाच्या SET परीक्षेतून ‘एसबीसी’ आरक्षण काढले, खुल्या प्रवर्गातून अर्ज करावा लागणार?

पुणे |खान्देश लाईव्ह न्यूज|सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी होणाऱ्या सेट परीक्षेत आरक्षणाच्या धोरणातून विशेष मागास प्रवर्गासाठी असणारे आरक्षण काढून टाकण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक
प्राध्यापक पदासाठी होणाऱ्या ‘राज्यस्तरीय पात्रता परीक्षे’त (सेट) आरक्षणाच्या धोरणातून विशेष मागास प्रवर्गासाठी (एसबीसी) असणारे आरक्षण काढून टाकण्यात आले आहे. सेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून ‘एसबीसी’चे आरक्षण नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे ४० वी सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) १५ जून रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी नोडल एजन्सी म्हणून पुणे विद्यापीठ काम पाहते.
ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार आणि पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येईल. दरम्यान, या परीक्षेच्या आरक्षण धोरणात ‘एसबीसी’चे आरक्षण नमूद न केल्याने परीक्षा देण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावा लागत असल्याचे समोर येत आहे.