उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “विकास पत्रकारिता”या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जळगाव | खान्देश लाईव्ह न्यूज|
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र
विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळा आणि विभागीय अधिस्विकृती समिती, नाशिक, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 मार्च 2025 रोजी “विकास पत्रकारिताः काल, आज, उद्या” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे प्रशाळेच्या सभागृहात सकाळी साडेदहा वाजता कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. व्ही. एल. माहेश्वरी राहणार आहेत.
उद्घाटनानंतर प्रथम सत्रात “पत्रकारांसाठीच्या शासनाच्या विविध विकास योजना” या विषयावर नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक किरण मोघे तर “अधिस्विकृती पत्रिका निकष आणि प्रक्रिया” या विषयावर अहिल्यानगर येथील दैनिक लोकमतचे संपादक तथा विभागीय अधिस्विकृती समिती नाशिक विभागाचे अध्यक्ष सुधीर लंके मार्गदर्शन करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात ” शासकीय योजना आणि विकास पत्रकारिता” या विषयावर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील तर ” विकास पत्रकारितेतील स्थित्यंतरे’ या विषयावर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य असलेले नाशिक येथील दैनिक दिव्य मराठीचे संपादक अभिजीत कुलकर्णी, अहिल्यानगर येथील महाराष्ट्र टाइम्सचे जिल्हा प्रतिनिधी विजयसिंह होलम, नाशिक विभागाचे टीव्ही नाईनचे ब्युरो चीफ चंदन पूजाधिकारी, नाशिक येथील दैनिक पुण्यनगरीचे आवृत्ती प्रमुख किरण लोखंडे उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रो.एस.टी. इंगळे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप होईल. या कार्यशाळेस जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित रहावे असे आवाहन माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक डॉ. सुधीर भटकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, डॉ. गोपी सोरडे, डॉ. सोमनाथ वडनेरे, अॅड. सूर्यकांत देशमुख यांनी केले आहे.