टपरीधारक आमदाराला पाडा खासदार संजय राऊत यांची टीका
गद्दारी केल्याने त्यांना घरी बसविण्याची वेळ
जळगाव |
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक टपरीवाल्यांना आमदार, खासदार व मंत्री केले. मात्र, या टपरीवाल्या आमदाराने गद्दारी केल्याने त्यांना घरी बसविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरनंतर तुम्हाला ते विधानसभेत दिसणार नाहीत, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बुधवारी रात्री धरणगाव येथील सभेत केली. या वेळी त्यांनी गुलाबराव
पाटील यांच्यावर सडकून टीका केली. महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ धरणगावातील कोट बाजार भागात शिवसेना कार्यालयासमोर खासदार
संजय राऊत यांची जाहीर सभा झाली. या वेळी खासदार राऊत म्हणाले, की पाणीपुरवठा खात्याचे मंत्री असताना गुलाबराव पाटील धरणगावकरांना पुरेसे पाणी देऊ शकत नाही, ही मोठी
शोकांतिका आहे. त्यांनी धरणगावात
उद्योग आणले नाहीत, पण सट्टा, पत्ता, ‘वाइन शॉप’ आणले. मंत्रिपदासाठी गुलाबराव पाटील उद्धव ठाकरे यांचे पाय धरत होते. मात्र, एका क्षणात सगळे विसरून सुरतमार्गे गुवाहाटीला पळून गेले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात निष्ठेच्या मोठ्या गप्पा मारायचे. या टपरीवाल्याला बाळासाहेबांनी मोठे केले म्हणून छाती ठोकून सांगायचे. आता गद्दारी केल्याने ते निष्ठावंत कार्यकत्यांच्या नजरेला नजर भिडवू शकत नाहीत, अशी सडकून टीका राऊत यांनी केली.