आमदार राजूमामा भोळे यांचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या टीकेला आव्हान
आ. राजूमामा भोळे यांचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या टीकेला आव्हान
जळगाव (प्रतिनिधी) : विरोधकांच्या मते राजूमामा नालायक पण जनतेच्या मनात आम्ही सेवक आहोत. विरोधी पक्षाने राजकारण करीत असताना त्याला मर्यादा हव्यात. बिनबुडाचे आरोप करू नये. भाजपला लोकसभेला मोठा लीड मतांचा मिळाला आहे. त्यामुळे हा पराभव त्यांना जिव्हारी लागला आहे. टीकेला उत्तर विकासातून द्यावे. आरोप सिध्द झाल्यास मी जाहीर माफी मागेल. आपण माहिती अधिकार मागवावा. त्यातून सत्य बाहेर येईल. त्यातून सर्व खरी माहिती जनतेला मिळेल, अशी माहिती आ. सुरेश भोळे यांनी दिली.
शहराचे आमदार राजू मामा तथा सुरेश भोळे यांनी रविवारी दि. २८ जुलै रोजी पत्रकार परिषद घेतली. महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन विविध आरोप आमदार भोळे यांच्यावर केले होते. आमदारांच्या टक्केवारीच्या गणिताने जळगावचा विकास रखडला. संपूर्ण महामार्ग खड्डेमय झालाय. रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. त्यासाठी आमदार निधी आणतात मात्र त्यातून त्यांनी २ कोटी रुपयांचे कमिशन घेतले आहे, असा खळबळजनक आरोप सुनील महाजन यांनी केला होता.
रविवारी रात्री साडेआठ वाजता पत्रकार परिषद घेऊन आमदार भोळे यांनी त्यांची बाजू मांडली. सदरहू दोन कोटी रुपये घेतल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. कमिशन खाल्याचे सिध्द करा, मी माफी मागेल मात्र डर्टी राजकारण करू नका .सुनील महाजन यांनी सदर आरोप सिद्ध करावा अन्यथा राजकारण सोडावे असे त्यांनी यावेळी महाजन यांना आव्हान दिले. डॉ. सुनील महाजन अध्यापक विद्यालयाचे कामदेखील मी करून दिले आहे. जनतेचे कामे आम्ही सतत करीत असतो. शहानिशा केल्याशिवाय भूमिका मांडू नये. लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. मी पैसे झाल्याचे सिध्द करा मी राजकारणातून निवृत्त होईन, असेही आव्हान आ.भोळे यांनी दिले.
३०० कोटींची गुंतवणूक करण्यासाठी कंपनीला वीजपुरवठा करणे नाकारण्यात आले. त्यामुळे हा प्रकल्प जळगाववरून पुण्याला गेला. या प्रकल्पामुळे जळगावात रोजगार निर्मितीची शक्यता होती, असाही आरोप सुनील महाजन यांनी केला होता.या आरोपावर आमदार भोळे म्हणाले की, असा कोणताच प्रकल्प जळगावातून गेला नाही. याबाबत माहिती घ्यावी.
लोकांना मदत करण्याच्या भूमिकेने राजकारण करा. विकासाची स्पर्धा करूया, घाणेरडे राजकारण करू नका असेही आ. भोळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, महेश जोशी, आरविंद देशमुख,महेश पाटील उपस्थित होते.